ठाणे : राज्यातील अनेक ठिकाणी मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आणि मराठी शाळांची घटती पटसंख्या हे वादाचे विषय ठरत असताना ठाणे जिल्ह्यात मात्र अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यावर्षी (2025-26) इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तब्बल 11 हजार 792 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांच्या पहिलीत दाखल झाले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
गेल्या काही वर्षांत खासगी इंग्रजी माध्यम शाळांकडे पालकांचा वाढता कल दिसत होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळांची जीर्ण अवस्था, शिक्षकांची अपुरी संख्या, तसेच शैक्षणिक साहित्याचा अभाव. परंतु आता शाळांच्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण, डिजिटल शिक्षणाचे साधन, इंग्रजी व मराठी भाषेतील मिश्रित अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम सुरू झाल्याने पालक पुन्हा शाळांकडे आकर्षित झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी राबविलेल्या ‘दिशा उपक्रमा’मुळे हा बदल घडून आल्याचे मानले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांची भौतिक सुधारणा, शिक्षकांसाठी आधुनिक प्रशिक्षण, स्मार्ट क्लासेस, तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साधनसामग्रीची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात आला. परिणामी पालकांचा विश्वास पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळत असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सध्या 1,328 जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुलांसाठी पौष्टिक आहार आणि क्रीडा साहित्य, डिजिटलायजेशन, स्मार्ट वर्गखोल्या, प्रयोगशाळा या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे.
शिक्षण विभागानुसार, पुढील काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे. स्मार्ट क्लासरूम, प्रयोगशाळा, वाचनालय आणि डिजिटल लायब्ररी यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, कला, संस्कृती व विज्ञान विषयक स्पर्धांचे आयोजन वाढवले जाणार आहे. या सकारात्मक बदलामुळे ठाणे जिल्हा पुन्हा एकदा मराठी माध्यम शिक्षणाचा आदर्श ठरत आहे.