MIM Corporator Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या काळात "कैसे हराया" आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ असे जाहीर सभेत इशारा देणार्या मुंब्र्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या विधानसभा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सहर शेख यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि आता त्यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश या राजकीय घडामोडींकडे मुंब्र्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या काळात सहर शेख यांनी आपल्या भाषणातून "कैसे हराया" आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यावेळी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच त्यांच्या आक्षेपार्ह भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरात एमआयएमबरोबरच नगरसेविका सहर शेख चर्चेत आल्या होत्या.
आता नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात येत असल्याचा उल्लेख नियुक्तीपत्रात करण्यात आला आहे. शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या विधानसभा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतील प्रवेश आणि त्यापाठोपाठ युनूस शेख यांना तत्काळ पदही देण्यात आल्याने मुंब्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
युनुस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक मानले जात. महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी सहर यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. निवडणूक जिंकल्यानंतर युनुस व सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला होता. "तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, मी आता माझ्या मुलीला एमआयएममधून निवडून आणलं आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये जर कधी फिरताना दिसला तर तुला दाखवतो," अशी थेट धमकी देत युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले होते.