ठाणे : येऊर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या परिचयाच्या तरुणांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मद्य प्राशन करून बर्थडे बॉय रोहन गिरी याला मारहाण करून धारदार चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 3 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
जखमी गिरीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वर्तकनगर येथे राहणारे तथा तक्रारदार रोहन रामाश्रय गिरी (28) या दिलेल्या तक्रारीत, 1 फेब्रुवारी रोजी रोहन गिरी हे त्यांचा मित्र हेमंत मौर्या याच्या वाढदिवसानिमित्त येऊर येथे गेले होते. यावेळी त्यांचे ओळखीचे प्रथमेश, आकाश व अमित यांनी दारू पिऊन रोहन गिरी यांना शिवीगाळ केली. त्या वेळी वाद झाला असून, त्यानंतर संबंधित इसमांनी रोहन गिरी यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सांगितल्यानुसार रोहन गिरी हे वर्तकनगर येथे गेले असता प्रथमेश याने त्यांच्या अंगावर धाव घेऊन कानाखाली मारून त्याला मारहाण केली.
त्यावेळी घटनास्थळी पंकज, तसेच आकाश व अमित हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी मिळून रोहन गिरी यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी रोहन गिरी पळून जात असताना प्रथमेश याने त्याच्याजवळील चाकूने पोटाजवळ वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर चौघेही पळून गेल असल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.