Online Gaming Addiction Death Case
नेवाळी :ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झालेल्या किरण परब (25, रा. कल्याण पूर्व, संतोषनगर) याने मलंगगडच्या कुशीवली गावात सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याने आपल्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून जीवन संपवले आहे.
त्याच्यावर खासगी बँकेचे तीन लाख पन्नास हजारांचे कर्ज होते. तर आईच्या दागिन्यांवर देखील त्याने दिड लाखांचा कर्ज घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरण ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
स्वतःला पेटवून घेताना त्याचा मोबाईल देखील जाळला असल्याची माहिती मिळाली आहे. हिललाईन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना प्रकाराची माहिती देत मृतदेह शविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
किरण सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. त्याने सहा वाजण्याच्या सुमारास कुशिवली गावच्या धबधब्याच्या परिसरात जाऊन आपल्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून जीवन संपवले. त्याने जीवन संपवल्यानंतर आगीच्या ज्वाला परिसरात दिसू लागल्याने तातडीने स्थानिकांनी धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले मात्र यात तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले.