Dombivli Youth Assault Pudhari
ठाणे

Dombivli Youth Assault: स्थानिक तरुणावर तिघा परप्रांतीयांकडून हल्ला; घरासमोरच्या सांडपाण्यावरून वाद उफाळला

डोंबिवली महाराष्ट्र नगरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: घरासमोर सांडपाणी साचत असल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याच्या कारणावरून जाब विचारणे मराठी तरूणाला चांगलेच महागात पडले आहे.

पश्चिम डोंबिवलीकडे असलेल्या महाराष्ट्र नगरामध्ये शेजारी राहणाऱ्या तिघा परप्रांतीयांनी मिळून एका स्थानिक तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आली आहे. परप्रांतीयांनी मराठी तरूणावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबईमध्ये मराठी-हिंदी वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वीच अंधेरीमध्ये एका टीसीने मराठी भाषेवरून हुज्जत घालत प्रवाशाला बंदिस्त केल्याचा प्रकार घडला होता.

ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगर परिसरात एका मराठी व्यक्तीला एका परप्रांतीय कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ही घटना शनिवारी ११ जुलै रोजी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नगरातील सोनाबाई चाळीजावळ घडली. सरोवर नगरातील सरोवर अंगण सोसायटीत राहणारा या हल्ल्यात जखमी तरूण विशाल पांडुरंग पाटील (३७) याच्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कुबेर आंगण सोसायटीच्या शेजारी असलेल्या गुरूचरण सोसायटीत राहणारे ओमकारनाथ श्रीनिवास तिवारी (५४), त्याचा मुलगा सत्यम (२७) आणि जय शुक्ला (२४) या तिघांनी मिळून विशाल पाटील याला शिवीगाळ केली. त्यानंतर बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर विशालला दांडक्याच्या साह्याने डोके, पाठ आणि खांद्यावर उपट्या टाकून बेदम मारहाण करून जबर दुखापत केली.

सांडपाण्यामुळे परिसरातील रहिवाशांना धोका

विशाल पाटील यांच्या घरासमोर सांडपाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई होण्याच्या शक्यतेमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे सांडपाणी पसरणाऱ्या प्रकाराला कारणीभूत असलेल्या समोरील सोसायटीत राहणारे ओंकारनाथ तिवारी यांना विशाल याने जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. विशाल पाटील हल्ल्यात जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. घरच्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या विशालला उचलून नजीकच्या रूग्णालयात दाखल केले.

सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर अद्याप हाती लागले नसून पोलिस उपनिरीक्षक गणेश देवरे आणि त्यांचे सहकारी त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र नगर/सरोवर नगर परिसरातील रहिवाशांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. किरकोळ कारणावरून होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT