डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : पूर्वेकडील ठाकुर्ली जवळच्या खंबाळपाड्यात राहणाऱ्या 30 वर्षीय तरूण त्याची 22 वर्षीय मैत्रिणी असे दोघे लिव्ह इन रिलेनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांनी हे दोघे लग्न करणार होते. तत्पूर्वीच मैत्रिणीने आपले जीवन संपुष्टात आणले.
स्वयंपाक बनविण्यासह मित्राच्या शर्टवर तेलाचे डाग पडल्याच्या कारणाने झालेल्या वादातून रागाच्या भरात मैत्रिणीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मित्राच्या कांचनगाव-खंबाळपाडा येथील राहत्या घरात हा प्रकार घडला आहे. मानसी संतोष नवघने (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. मानसीच्या तीस वर्षीय नोकरदार मित्राने दिलेल्या माहितीनुसार टिळकनगर पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
या संदर्भात हकीकत अशी की, पोलिसांना माहिती देणारा मित्र आणि त्याची मैत्रिण मानसी नवघने हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मानसी प्रमाणापेक्षा अधिक स्वयंपाक करते, यावरून दोघांच्यात वाद होत असत. या वादातून मानसीने मित्राला ऑफीसला जाण्यासाठी जेवणाचा डबा दिला नाही. मित्राने बाहेरून मांसाहारी बिर्याणी खरेदी केली. ही बिर्याणी त्याने ऑफीसला जाण्यासाठीच्या बॅगमध्ये ठेवली होती. त्याच बिर्याणीमधील तेल बॅगमधून निथळून मित्राच्या शर्ट आणि बनियनला लागले. हे पाहून मानसीने तुझ्या शर्टला आणि बनियनला कसले डागे लागले आहेत, अशी विचारणा केली. घरातून जेवणाचा डबा दिला नाहीस, म्हणून मी बाहेरून मांसाहरी बिर्याणी खरेदी केली. त्याच बिर्याणीमधून निथळलेले तेल बाहेर येऊन माझ्या शर्टला आणि बनियनाला लागल्याचे मित्राने सांगितले. बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने मित्र संतप्त झाला.
मित्र आणि मैत्रिणींमध्ये या विषयावरून भांडणजुंपले. आपले लग्न जवळ आले असताना आता किरकोळ कारणावरून का भांडतेस ? असा सवाल मित्राने विचारला. आता तू लग्न कसा करतोस, ते मी बघते, असे रागात बोलून मानसीने घरातील केस कापण्याचे मशीन घेऊन बाथरूममध्ये गेली. डोक्यावरील सगळे केस कापून टाकले. हा प्रकार पाहून मी घर सोडून जातो, असे बोलून मित्र बाहेर जाण्यास निघाला. त्यावेळी मैत्रिणीने तुला जायचे तेथे जा, असे बोलून रागाच्या भरात बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला.
हा प्रकार नंतर लक्षात आल्यावर मित्राने दरवाजा तोडून आत पाहिले असता मानसी गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आली. मित्राने तातडीने गळफास सोडवून मानसीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेले. तथापी तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मानसीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शास्त्रीनगर रूग्णालयात नेला. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.