बदलापूर ः लोकल पडण्याच्या प्रयत्नांत झालेल्या अपघातात एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर शनिवारी सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात घडली. चेतना देवरे (28) असे या महिलेचे नाव असून त्या बदलापूर पूर्वेकडील ज्युवेली परिसरात राहत होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी सकाळी चेतना देवरे बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सकाळी 8.10 ची लोकल पकडण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यावेळी लोकल सुटली होती. ती धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.
प्लॅटफॉर्म तीनवर मुंबई दिशेला प्लॅटफॉर्म संपतो त्यापासून काही अंतरावरच लोकल उभी असते. त्यामुळे पहिला लेडीज डबा पकडताना चेतना यांचा तोल जाऊन त्या थेट रुळावर कोसळल्या आणि लोकलचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. चेतना देवरे या बदलापूर पूर्वेतील ज्युवेली गाव परिसरातील जगन्नाथ गॅलेक्सी या सोसायटीत वास्तव्यास होत्या.
वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते, आणि ठाण्यातील एका कंपनीत नोकरीला होत्या. त्या दररोज बदलापूर ते ठाणे असा लोकल प्रवास करीत होत्या. मात्र धावती लोकल पकडण्याचा निर्णयामुळे शनिवारचा त्यांचा लोकल प्रवास अखेरचा प्रवास ठरला.
अशी घडली दुर्घटना ?
मुंबई दिशेकडील पहिलाच महिला डबा पकडताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्या लागलीच प्लॅटफॉर्मच्या खाली पडल्या. दुर्दैवाने प्लॅटफॉर्मचा शेवट असल्याने त्या थेट लोकल खालीच आल्याने मृत्यू झाला. त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र लोकल ट्रेन सुरू झाल्यावर चेतना यांनी कोणताही विचार न करता थेट लोकल पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना बघण्याशिवाय काहीही मार्ग नव्हता.
रोज दुर्घटना, प्रवाशी असुरक्षीत
मुंबईकरांची जीवनवाहीनी लाकल दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. वारंवार दुर्घटना समोर येत आहेत. गर्दीत शाब्दिक बाचाबाची झाल्याने एका प्रवाशाने दुसऱ्याला भोसकल्याने त्याचा मृत्यूची घटना ताजी असताना शुक्रवारी गर्दीमुळे दरवाज्यात उभे राहून प्रवास करणारे तीन प्रवाशी धावत्या लोकलमधून शीव रेल्वे स्थानकाजवळ पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
लोकल संख्या वाढवण्याची मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी बदलापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करीत असतात. अगदी सुटीच्या दिवशीही लोकल गाड्या गर्दीने खचून भरलेल्या असतात. त्यामुळे लोकल गाड्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी लोकल गाड्यांची संख्या वाढवणे, लोकल डाव्यांची संख्या वाढवणे, महिला स्पेशल लोकल सुरू करणे अशा अनेक मागण्या रेल्वे प्रवासी व प्रवासी संघटनांकडून सातत्याने केल्या जात आहेत. शनिवारी झालेल्या अपघातानंतरही रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून गर्दीच्या वेळेत लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.