सापाड/डोंबिवली : देशभरात मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जाणाऱ्या मॅगीमध्ये आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. मॅगी बनवत असताना त्यामध्ये आळ्या असल्याचे निदर्शनास आले.
आळ्या दिसताच मॅगी खाण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. मात्र पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला या घटनेमुळे धक्का बसला आहे.
कल्याणमध्ये एका कुटुंबाकडून मॅगी बनविण्यासाठी पॅकेट उघडण्यात आले. मॅगी तयार करत असताना त्यामध्ये आळ्या असल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच मॅगी खाणे थांबविण्यात आले. त्यामुळे लहान मुलांसह कुटुंबातील सदस्यांनी दूषित खाद्यपदार्थाचे सेवन करण्यापासून बचाव झाला.
विशेष म्हणजे मॅगीच्या पॅकेटवर फेब्रुवारी 2027 पर्यंतची एक्सपायरी डेट नमूद आहे. त्यामुळे उत्पादनाची मुदत संपलेली नसल्याचा विश्वास ठेवून ग्राहकाने हे उत्पादन खरेदी केले होते. मात्र प्रत्यक्षात मॅगीमध्ये आळ्या आढळल्याने उत्पादनाची गुणवत्ताबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मॅगीसारखे पॅकेज्ड खाद्यपदार्थ ग्राहक विशेषतः लहान मुले मोठ्या विश्वासाने खातात. त्यामुळे अशा उत्पादनामध्ये आळ्या आढळल्याचे समोर आल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. हा प्रकार उत्पादनाच्या पातळीवर घडला की वाहतूक, साठवणूक अथवा विक्रीच्या ठिकाणी झालेल्या अयोग्य हाताळणीमुळे झाला, याची अधिकृत तपासणी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासण्या आणि कारवाई सुरू असताना कल्याणमधील या प्रकारामुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मोठ्या ब्रँडच्या उत्पादनाबाबत अशी तक्रार समोर येत असल्यास संबंधित उत्पादनाचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, तसेच उत्पादनाचा बॅच नंबर, उत्पादन तारीख, विक्रीचे ठिकाण आणि साठवणुकीची पद्धत यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मॅगीच्या पॅकेटवरील एक्सपायरी डेट वैध असली तरी फक्त एक्सपायरी डेटवरून उत्पादनाची गुणवत्ता ठरवता येत नाही. उत्पादनाची योग्य साठवणूक झाली आहे का, पॅकेट खराब किंवा छेडछाड झालेले आहे का, तसेच उत्पादनाच्या बॅचमध्ये काही समस्या आहे का, हे तपासणे आवश्यक ठरणार आहे.
उत्पादनाची तातडीने तपासणी करण्याची मागणी
या घटनेनंतर पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बाजारातून सीलबंद पॅकेटमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर ग्राहक विश्वास ठेवतात. त्यामुळे पॅकेटवरील माहिती आणि उत्पादनाची मुदत तपासूनही त्यामध्ये खराबी आढळल्यास ग्राहकांनी तक्रार कुठे करायची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. दरम्यान, मॅगीमध्ये आळ्या आढळल्याचा प्रकार झाल्याने संबंधित उत्पादनाची तातडीने तपासणी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.