Woman Attacked in Dombivli
डोंबिवली : रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला आधी ठोकर मारली, त्यानंतर त्या मुक्या जीवाला मारहाण देखील केली. हा सारा प्रकार पाहवत नव्हता, म्हणून त्या पिल्लाला वाचविण्यासह जाब विचारणाऱ्या ३५ वर्षीय प्राणीमित्र महिलेला दुचाकीस्वाराने शिवीगाळ करत मारहाण तर केलीच, शिवाय तिचा विनयभंग केल्याची गंभीर घटना डोंबिवली जवळच्या नांदिवली टेकडी परिसरात बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पसार झालेल्या अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित महिला बुधवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास नांदिवली टेकडी परिसरातील रस्त्यावरून पायी जात होती. त्याचवेळी एम एच ०५/इ सी/२६१७ क्रमांकाच्या दुचाकीवरील अनोळखी व्यक्तीने रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीने धडक दिली. त्यानंतर त्या पिल्लाला स्कुल बॅगने मारहाण करण्यास सुरूवात केली.
हा अमानुष प्रकार पाहून महिलेने संबंधित व्यक्तीला जाब विचारला. तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. पिल्लू तुमचे नाही ना, मग या पिल्ला मी मारून टाकेन नाहीतर काहीही करेन. तुम्ही मधे पडू नका, असे बोलून दुचाकीस्वाराने त्याच्या जवळील दप्तराने पिल्लाला मारहाण सुरू केली. हा दुचाकीस्वार सांगुनही ऐकत नसल्याने हा माणूस वेडा आहे की काय, असा सवाल महिलेने केला.
यावर चिडलेल्या दुचाकीस्वाराने महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्या थोबाडीत मारली. एवढ्यावरच न थांबता त्याने अश्लील चाळे करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. महिलेने प्रतिकार करताच आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या भयभीत महिलेने मानपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत अनोळखी दुचाकीचालकाविरोधात शिवीगाळ, मारहाणीसह विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सदर तक्रारीत नमूद केलेल्या दुचाकी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.