डोंबिवली : डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर मारेकरी पतीने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
फरार मारेकऱ्याला शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत. तर दुसरीकडे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही तपास चक्रांना वेग दिला आहे. पोलिसांनी सद्गुरू निवास चाळीतील घरमालक वासुदेव निवृत्ती दिवाणे (३२) यांच्या फिर्यादीवरून पोपट दिलीप दाहिजे (३९) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काटई नाक्यावरील कोळेगावात असलेल्या कृष्णाई नगरमध्ये असलेल्या सद्गुरू निवास चाळीतील रूम नं. ४ मध्ये ज्योती (२९) आणि पोपट दाहिजे हे दाम्पत्य राहते. पोपट हा यश डेव्हलपर्सकडे बिगारी म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी यश डेव्हलपर्सचे बाळासाहेब म्हस्के यांनी घरमालक वासुदेव दिवाणे यांना पोपट कामावर का आला नाही ? हे विचारण्यासाठी राहत्या पत्त्यावर गेले असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे दिसून आले.
घरमालक वासुदेव यांना कळविले. म्हणून वासुदेव यांनी पोपटच्या घरी गेल्यानंतर बाळासाहेब म्हस्के यांनी ज्योतीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. ज्योतीच्या मोबाईल फोनचा आवाज घरातून येत होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता फरशीवर रक्ताचे डाग आढळून आले. अखेर घरमालक वासुदेव दिवाणे आणि बाळासाहेब म्हस्के यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दाराला बाहेरून लावलेले कुलूप तोडून खोलीमध्ये प्रवेश केला असता ज्योती पोपट फरशीवर निपचीत पडल्याचे आढळून आले.
घरमालक वासुदेव यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलीसांच्या मदतीने स्थानिक डॉक्टरांना घटनास्थळी बोलावले. डॉक्टरांनी तपासून ज्योती हिला मृत घोषित केले. पती पोपट याने ओढणीच्या साह्याने पत्नी ज्योतीचा गळा आवळून तिला ठार मारल्यानंतर दाराला कुलुप लावून पळून गेल्याचे घरमालक वासुदेव दिवाणे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.
वाद विकोपाला गेल्याने कृत्य
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती आणि पोपट यांच्यामध्ये गुरूवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पोपट धाहीजे याने संतापाच्या भरात पत्नी ज्योतीचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून तिची हत्या केल. ज्योती निपचित पडल्याची खात्री पटल्यानंतर पोपटने दाराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आल.
मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर ज्योतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाकडे पाठवून दिला. तर दुसरीकडे पोलिसांनी पोपट धाहीजे याला हुडकून काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संभाव्य ठिकाणे आणि परिचित लोकांकडून माहिती घेण्यात येत आहे. या घटनेनंतर कोळेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.