Who Was Pradeep Poornaker Pudhari
ठाणे

Who Was Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर कोण होते? ठाण्यात हत्या झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्याची नेमकी ओळख काय?

Who Was Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख होते. त्यांना ‘बाळू’ या नावानेही ओळखले जात होते.

Rahul Shelke

Who Was Pradeep Purnekar: ठाणे शहरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी आधी पूर्णेकर यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे मनोरमा नगर येथील आपल्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी काही हल्लेखोर तिथे आले. त्यांनी पूर्णेकर यांच्यावर आधी हल्ला करून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना तातडीने घोडबंदर रोड परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोण होते प्रदीप पूर्णेकर?

प्रदीप पूर्णेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख होते. ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय होते. त्यांना ‘बाळू’ या नावानेही ओळखले जात होते.

माजी खासदार राजन विचारे यांचे जवळचे सहकारी म्हणूनही पूर्णेकर यांची ओळख होती. त्यांच्या कुटुंबाचाही ठाण्यातील राजकारणाशी संबंध आहे. त्यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर हे ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनीही महापालिका निवडणूक लढवली होती.

नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम

पूर्णेकर हे केवळ राजकीय कामापुरते मर्यादित नव्हते. मनोरमा नगर परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवरही ते सक्रियपणे काम करत होते. या भागात पुनर्विकासाची कामे सुरू असून, त्यासंदर्भातील काही प्रश्नांवर त्यांनी नागरिकांची बाजू घेतल्याची माहिती आहे. ठाण्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येविरोधातही ते आवाज उठवत होते, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

हल्लेखोर मास्क आणि हेल्मेटमध्ये

हल्ल्याच्या वेळी आरोपींनी चेहऱ्यावर मास्क लावले होते, तर काही जणांनी हेल्मेट घातले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी ठाण्यातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

हत्येमागचं कारण काय?

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर ठाण्यात राजकीय वातावरणही तापलं आहे. त्यांच्या कुटुंबीय, सहकारी आणि समर्थकांकडून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या हत्येचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT