water shortage in rural areas including Kalyan-Dombivli
सापाड : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा सुरू होताच कल्याण-डोंबिवली शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांमध्ये अद्यापही नळाला पाणी येत नसून, नागरिकांना पाण्यासाठी वनवण करावी लागत आहे. तर अनेक भागांमध्ये नळांमधून येणारे पाणी अत्यंत दुषीत, पिवळसर व दुर्गंधीयुक्त असून त्यामुळे आरोग्यधोके निर्माण झाले आहेत. परिणामी साथीच्या आजारांना निमंत्रण देण्याचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे तात्काल पाणी समस्या दूर करण्याची मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खडकपाडा परिसरात पुन्हा एकदा पाण्याची पाईप लाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. गेल्या आठवड्यात याच परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटून आठवडाभर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण शहरात पाणीपुरवठा ठप्प झाला होता. पाण्याअभावी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते.
तर पाणी टंचाईमुळे टैंकर माफीयांचे चांगभलं सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला तान पडत असून जीवनावश्यक गरज भागवण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेकडून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागले आहे. कल्याण डोंबिवलीत काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला आहे, तर काही भागात फक्त थेंबाथेंबाने पाणी येत आहे.
त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे शाळा, रुग्णालये आणि व्यावसायिक परिसरांमध्ये देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेचे अधिकारी म्हणाले, मुख्य लाईनमधील गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
येत्या २४ तासांत स्थिती पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, नागरिकांनी प्रशासनाकडून अधिक स्पष्टता आणि वेळेत सेवा मिळावी, अशी मागणी केली आहे. डोंबिवली पूर्वेतील कोळीवाडा, आयरे गाव, पिसवली, तिसगाव, कल्याण परिसरातील श्री कॉम्प्लेक्स, मिलिंद नगर, कोळसेवाडी, नांदिवली, चिंचपाडा तसेच कल्याण पश्चिमेतील आदर्श कॉलनी, खडकपाडा, डोंबिवली ग्रामीण परिसरात पाण्याचा पुरवठा अत्यंत अपुरा आहे. अनेक भागांमध्ये चार दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही.
तसेच ज्या भागांमध्ये पाणी येत आहे, तेथे नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य नसून चिखलकट आणि दुर्गंधीयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून, गोरगरिबांवर त्याचा आर्थिक भार पडतोय. महापालिकेने आम्हाला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा द्यावा, ही आमची मागणी आहे. दरवर्षी पावसातच हीच परिस्थिती का निर्माण होते? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिका व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेत सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले गेले आहे. काही भागांमध्ये टँकरने पाणी देण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे, मात्र ती पुरेशी नाही.
कल्याण-डोंबिवलीतील पाणीटंचाई ही केवळ तात्पुरती अडचण न राहता, ती एक गंभीर नागरी समस्या बनली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्यान लक्ष देऊन भविष्यातील अशा समस्या टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असतानाच या संधीचा गैरफायदा घेत काही खाजगी व अधिकृत टैंकर मालकांनी पाण्याच्या नावावर लूट सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
66 अशुद्ध पाण्यामुळे उलट्या,जुलाब, त्वचारोग आणि पोटदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच अशी पाणीटंचाई आणि दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होणं ही प्रशासनाची गंभीर अपयशाची निशाणी मानली जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्याची गरज आहे.- हिंदवी भानुशाली, डॉक्टर