Water Pipeline Project pudhari photo
ठाणे

Shrikant Shinde : 27 गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

अमृत योजनेसाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध; राज्य सरकारकडून अतिरिक्त 50 कोटी-खासदार डॉ. शिंदे

पुढारी वृत्तसेवा

कल्याण / डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत योजनेच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाने नुकताच 50 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. महापालिकेकडून 50 कोटी आणि राज्य शासनाकडून 50 कोटी, असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून अमृत योजनेची उर्वरित कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत.

येत्या काही महिन्यांत 27 गावांमध्ये जलवाहिन्या टाकणे, पाण्याच्या टाक्या उभारणे आदी कामांना गती मिळणार असून नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभागृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. रस्ते, उड्डाणपूल, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था यांसह विविध प्रकल्पांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. शहरांतील जलवाहिनी व्यवस्था जुनी झाल्याने नव्या पद्धतीने पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. पाणी पुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने 268 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महापालिकांना विविध मार्गांनी निधी उभारण्याची विशेष तरतूद केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी कसा उपलब्ध करून देता येईल, या संदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली.

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम जलद गतीने सुरू असून या प्रकल्पाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाला कामाला आणखी गती देण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या.

त्याचबरोबर शहरातील वाहतुकीला नवा आयाम देणाऱ्या यू-टाईप रस्ते प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. तसेच इतर विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन महापालिका क्षेत्रातील बीएसयुपी घरांमध्ये करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पुनर्वसनापूर्वी बीएसयुपी घरांची गुणवत्ता आणि स्थिती उत्तम असावी, अशा सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.

डोंबिवलीमध्ये टिळक रोडला उभारण्यात येत असलेल्या कॅन्सर हॉस्पिटल आणि सुतिकागृह प्रकल्पांचा आढावा घेताना येत्या दोन वर्षांमध्ये हे रुग्णालय पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच डोंबिवलीचे शास्त्रीनगर आणि कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय यांचा पुनर्विकास गतीने करून ठाणे शहराच्या धर्तीवर प्रत्येकी 500 बेडची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या.

रिंग रोड प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन पूर्ण

कल्याण आणि परिसरातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याण रिंग रोड प्रकल्पाचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या टप्पा एक ते टप्पा आठपर्यंतच्या कामांची माहिती घेण्यात आली. टप्पा तीनसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून त्या भागातील कामांना आता गती मिळणार आहे. उर्वरित भागांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

फेरीवाला धोरणासह पार्किंग धोरण तयार

केडीएमसी क्षेत्रातील फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फेरीवाला धोरण आणि पार्किंग धोरण तयार करण्यात आले असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणामुळे शहरात नागरिकांना पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध होईल. तसेच फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि गैरसोयींनाही आळा बसेल, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT