डोळखांब ( शहापूर, ठाणे) : दिनेश कांबळे
शहापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे भीषण पाणीटंचाई सुरू असून टंचाईवर मात करण्यासाठी केवळ सापगाव जवळील एकच भातसा नदीचा आधार असल्याने टँकर चालकांना लांबचा प्रवास करावा लागत आहे. तर फेर्या देखील कमी लागत आहेत.
धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून 110 ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांशी नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीत 27 गावे आणि 108 पाडे मिळून 135 गावपाड्यांना 37 टँकरने दररोज सापगाव जवळील भातसा नदी याठिकाणाहून पाणी पुरवठा करावा लागतो. कारण भातसा नदीशिवाय अन्य जलस्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे लांबच्या गावपाड्यांना कमी फेर्या लागत आहेत. तसेच बारा, चौदा, सोळा चाकांची मोठी वाहने असल्याने घाट माथ्यावर तसेच वळणाचे ठिकाणी गाड्या चढण्यास त्रास होत आहे. तर निम्मा दिवस प्रवासात जात आहे. याकरिता टंचाईचा सामना करणे कठीण होत आहे.
सद्या टाकीपठार, डोंगरवाडी, उंबर -वाडी, चाफेचीवाडी, तलवाडा, गांडुळवाड, चिंध्याचीवाडी, कोथळा, कळभोंडे, अजनुप, कसारा, शिरोळ, साकडबाव भागात भीषण पाणीटंचाई आहे. तालुक्यात 110 ग्रामपंचायतींत जलजीवन मिशनच्या सद्या 197 पाणी योजना मंजूर असून मुदत संपूनही कामे पूर्ण झालेली नाहीत.
वर्षभरापासून ठेकेदारांना कामाचे बिल मिळाले नाही. पाईपलाईन, टाक्यांच्या बांधकामास जागा निश्चित नाहीत. तसेच 2004 रोजी भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, जल स्वराज्यसारख्या दोनशेच्या वर योजना पूर्ण नाहीत. हाताचे बोटावर मोजण्याइतक्या योजना पूर्ण झाल्या तरी लाईट बिल न भरणे, मोटर, ट्रान्सफॉर्मर चोरीला जाणे अशा विविध कारणास्तव बंद आहेत. यावर वेळीच कारवाई तसेच उपाययोजना होणे देखील गरजेचे आहे.
शहापूर तालुक्यात डोळखांब, खराडे, वेहळोली, मुसई, जांभे, आदिवली या लघुपाटबंधारे विभागाचे धरणात मोठ्याप्रमाणात गाळ साचला असून धरणातील पाण्याने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे ही सर्व धरण मिळून धरणाचे साठवण क्षमतेच्या तुलनेत कमी प्रमाणात पाणी शिल्लक आहे. याकरिता भविष्यात या धरणातील गाळ काढून आणि प्रत्येक धरणाची उंची वाढविल्यास येथील साठवण क्षमता वाढणार आहे. त्यामुळे भातसावरून पाणी उचलण्यापेक्षा पाटबंधारे विभागाचे प्रत्येक धरणातून पाणी उचलले आणि त्या भागातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना पुरवठा केला तर टँकरच्या फेर्या वाढतील आणि वेळ देखील वाचेल. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करणे सोपे होईल.