Wagle Estate Industrial Transformation Pudhari
ठाणे

Wagle Estate Industrial Transformation: वागळे उद्योगनगरीचा ‘आयटी हब’कडे प्रवास

वागळे पट्ट्यात ९० पेक्षा अधिक आयटी पार्क राहिले उभे

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात केवळ ठाणे जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात मोठे स्थान मिळवून देणाऱ्या वागळे औद्योगिक वसाहतीची आता बदलत्या अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात औद्योगिक पारंपरिक ओळख गमावली आहे.

एकेकाळी उत्पादन, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध लघु-मध्यम उद्योगांनी गजबजलेला हा परिसर आता आयटी पार्क, कॉर्पोरेट कार्यालये, व्यावसायिक आस्थापना आणि सर्व्हिस सेंटर्सने घेतली आहे.

या पट्यात आता केवळ ४०० छोटे युनिट सुरु असून बंद पडलेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या कंपन्यांच्या जागेवर आता ९० पेक्षा अधिक आयटी कंपन्यांनी आपला पसारा वाढवला आहे.

वागळे इस्टेटची स्थापना १९६०च्या दशकात झाली. महाराष्ट्रातील सुरुवातीच्या औद्योगिक वसाहतींपैकी ही एक असून, येथे मोठ्या उद्योगांसोबत हजारो लघु व मध्यम उद्योगांचीही उभारणी झाली.

उत्पादन क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार निर्माण झाला होता. मात्र कालांतराने वाढत्या जमिनीच्या किमती, उत्पादन खर्च, कुशल मनुष्यबळाची कमतरता, बदलते तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांवरील मर्यादा आणि बाजारपेठेतील बदल यामुळे अनेक पारंपरिक उद्योग बंद पडले किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झाले.

त्यामुळे वागळे इस्टेटमधील ४०० पेक्षा अधिक लघुउद्योग विविध कारणांनी बंद पडले होते.कोरोना काळात या प्रक्रियेला आणखी वेग मिळाल्याचे दिसून आले. काही उत्पादन युनिट्स आर्थिक अडचणींमुळे बंद झाली, तर काही उद्योगांनी उत्पादन अन्य औद्योगिक केंद्रांकडे हलवले. परिणामी अनेक ठिकाणी पूर्वी गजबजलेल्या कारखान्यांच्या जागांवर आता आयटी पार्क उभे राहिले आहेत.

ठाण्याची मुंबईशी असलेली जवळीक, उत्तम वाहतूक संपर्क, उपलब्ध मनुष्यबळ आणि वाढत्या कार्यालयीन मागणीमुळे याच जागेकडे आयटी आणि सेवा क्षेत्राचे लक्ष वेधले गेले. १९९८च्या आयटी धोरणानंतर ठाण्याचा आयटी क्षेत्रातील विकास वाढला आणि वागळे इस्टेटमध्येही औद्योगिक जागांचे रूपांतर आधुनिक कार्यालयीन संकुलांमध्ये होऊ लागले.

आज आयटी पार्क आणि कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परिसराला नवी आर्थिक ओळख मिळत आहे.मात्र हा बदल केवळ विकासाचा विजय म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. उत्पादन उद्योग बंद पडल्याने त्यांच्याशी जोडलेली कामगारांची साखळी, छोटे पुरवठादार, कंत्राटी कामगार आणि स्थानिक व्यवसाय यांच्यावरही परिणाम झाला आहे.

अलीकडेच वागळे इस्टेटमधील काही कार्यरत लघुउद्योगांना पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतराच्या नोटिसा मिळाल्याने उद्योगविश्वात चिंता निर्माण झाली. संबंधित उद्योगांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक प्लॉटवर अतिक्रमण झाले आहेत.

अनेक उद्योग हे ठाण्याच्या बाहेर म्हणजे अंबरनाथ,बदलापूर तसेच पालघर या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे वागळे इस्टेटसमोरील खरा प्रश्न ‘उद्योग विरुद्ध आयटी’ असा नसून ‘जुने उद्योग वाचवत आधुनिक उद्योगांना कशी जागा द्यायची?’ हा आहे.

आयटी पार्कमुळे रोजगार, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राला चालना मिळत असली, तरी उत्पादन क्षेत्र पूर्णपणे नाहीसे झाल्यास स्थानिक औद्योगिक परिसंस्थेचे मोठे नुकसान झाले आहे .

वागळे इस्टेटचा प्रवास हा केवळ एका औद्योगिक वसाहतीचा बदल नाही; तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्राकडून सेवा व तंत्रज्ञान क्षेत्राकडे होत असलेल्या संक्रमणाचे प्रतिबिंब आहे. विकासाच्या या नव्या पर्वात आयटीची उंच इमारत उभी राहत असताना, त्या सावलीत महाराष्ट्राची जुनी औद्योगिक ओळख पूर्णपणे हरवू नये, हीच अपेक्षा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT