

डोंबिवली: उपचाराच्या सूचना दिल्याच्या साध्या कारणावरून डॉक्टरला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली होती. या घटनेनंतर अखेर कोळसेवाडी पोलिसांनी फौजदारी कारवाई करत हल्लेखोर तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कल्याण पूर्वेकडे पुना लिंक रोडला असलेल्या भानूज्योत रूग्णालयात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. जयवंत देशमुख हे तपासणीसाठी आले असता तेथील डॉक्टर योगेंद्र जैस्वाल (४१) यांनी त्यांची तपासणी करून औषधे, पथ्य आणि पुढील उपचाराबाबत सविस्तर सूचना दिल्या.
त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा विनीत जयवंत देशमुख (३०) याने अचानक डॉक्टरांशी अरेरावीची भाषा वापरत वाद घालण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी त्याला शांतपणे आणि आदराने बोलण्यास सांगितले असता त्याचा राग अनावर झाला.
संतापाच्या भरात त्याने डॉक्टरांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या दालनातच अंगावर धावून जात बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर काही वेळ त्यांचा गळा पकडून दाबून धरल्याने एकच खळबळ उडाली.
त्यावेळी रूग्णालयात उपस्थित असलेल्या इतर रूग्णांच्या नातेवाईकांनी तातडीने हस्तक्षेप करून डॉक्टरांची सुटका केली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हा सर्व संतापजनक प्रकार रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉ. योगेंद्र जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी विनीत देशमुख याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३२४ (४) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.