Leopard Rescue Pudhari
ठाणे

Leopard Rescue: ठाण्यात बिबट्याचा थरार अखेर थांबला; झाडीत दबा धरलेल्या जखमी नर बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: वागळे इस्टेटमधील इंदिरानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या बिबट्याचा अखेर वन विभागाने रविवारी थरारक बचाव करत ताबा घेतला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील झाडीत लपून बसलेल्या जखमी नर बिबट्याला डार्टगनच्या सहाय्याने बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेटमधील इंदिरानगर परिसरात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर वन विभाग सतर्क झाला होता.

शनिवारी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने रविवारी पहाटेपासून विशेष शोधमोहीम सुरू केली. बिबट्या दिसलेल्या ठिकाणापासून सुमारे 70 ते 80 मीटर अंतरावरील दाट झाडीत तो दबा धरून बसल्याचे वन अधिकाऱ्यांना आढळून आले.

हा बिबट्या जखमी आणि अशक्त अवस्थेत असल्याने त्याला जाळ्यात पकडणे धोकादायक ठरू शकत होते. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांच्या देखरेखीखाली डार्ट मारून त्याला बेशुद्ध करण्यात आले.

प्राथमिक तपासणीत हा नर बिबट्या अंदाजे चार ते पाच वर्षांचा असल्याचे समोर आले. त्याच्या चारही पंजांच्या तळव्यांवर गंभीर जखमा आढळून आल्या असून मागील पायावरही मोठी जखम आहे. याशिवाय अंगावर आणि शेपटीवर अनेक व्रण आहेत. जखमांमुळे तो अशक्त झाल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT