वाडा (ठाणे) : मच्छिंद्र आगिवले
वाडा नगरपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी मोठी रंगत वाढली असून ४० उमेदवारांनी सदस्य पदासाठी तर ३ नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. शिंदेसेनेची फारशी चर्चा नसतांना ऐनवेळी जिजाऊ संघटनेच्या हेमांगी पाटील यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर अर्ज दाखल केल्याने शिंदेसेनेत जल्लोषाचे वातावरण बघायला मिळाले. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून उबाठा गटासह बविआ व भाजपाच्या सर्व जागी उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज रविवारी (दि.16) दाखल केले आहेत.
वाडा नगरपंचायत निवडणूक आता रंगतदार वळणावर आली असून नगराध्यक्ष पदासह बहुतांशजागी उमेदवार निश्चिती झाल्याने आता उमेदवार प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. उबाठा व भाजपा यांच्यात खरी लढत होईल अशी शक्यता असताना जिजाऊ संघटनेच्या उमेदवार हेमांगी पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिंदेसेनेतून आपला अर्ज दाखल करताच निवडणुकीच्या रिंगणात चुरस वाढली आहे. हेमांगी पाटील या वाड्यातील काहीशा कलंकीत ठेकेदार लॉबीपासून अलिप्त व सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविलेल्या उमेदवार असल्याने त्या निवडणुकीत रंगत आणतील
अशी चिन्ह आहेत.
शिवसेनेच्या हेमांगी पाटील, भाजपाच्या रिमा गंधे तर उबाठाच्या वतीने निकिता गंधे यांसह अन्य एका उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असून नगरपंचायत निवडणुक आता तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. शिंदेसेनेसोबत राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार) एकत्र निवडणूक लढविण्याच्या हालचाली देखील वेग घेत असून याबाबत लवकरच निश्चिती होईल असे सेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनी सांगितले.
आतापर्यंत ७० अर्ज दाखल
वाडा नगरपंचायत क्षेत्रातील १७ प्रभागात आतापर्यंत ७० अर्ज दाखल करण्यात आले असून नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज भरण्यात आले आहेत. शिवसेना, भाजपा, उबाठा, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, बविआ अशा प्रमुख पक्षांनी आपले अर्ज दाखल केले असून सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवार निश्चितीनंतर आता प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते कंबर कसतील. वैयक्तिक नातेसंबंध, जात व धर्म या मुद्द्यांसह आर्थिक गणित महत्वाचे ठरणार असून प्रचारात कोणता पक्ष आघाडी घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.