Wada Factory Blast Pudhari
ठाणे

Wada Factory Blast: वाड्यात कारखान्यात भीषण स्फोट; एसी यंत्रणा दुरुस्तीवेळी तीन कामगारांचा मृत्यू

अबिटघर औद्योगिक क्षेत्रातील घटना; सुरक्षेच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्यातील अबिटघर (अभाणपाडा) गावात एका कंपनीत वातानुकुलीत यंत्रणा दुरुस्तीसाठी आलेल्या 3 कामगारांचा याच यंत्रणेच्या स्फोटात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने कारखान्यातील बेपर्वाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली असली नेमका दोष कुणाचा याबाबत सखोल चौकशी करून याबाबत गंभीर गुन्ह्यांची नोंद होणे गरजेचे आहे असे लोकांचे म्हणणे आहे.

अबिटघर (अभाणपाडा) गावात विस्तार मेटल नावाची कंपनी जानेवारी महिन्यापासून सुरू असून आठ वर्षानंतर ही कंपनी पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 27 कंपनीतील वातानुकूलित यंत्रणेत काही बिघाड झाल्याने काही कामगार दुरुस्ती करीत असताना अचानक रात्री 11 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की ज्यात मोहम्मद अली अन्सारी 32 (मुंबई, कुर्ला), अखिलेश कुमार मोतीलाल जैस्वाल (45 उत्तरप्रदेश) आणि किसन भिवा निकम (55 सायन, मुंबई ) या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह बहुतांश भाजलेल्या अवस्थेत असून अंगात लोखंडी अवशेष घुसलेले होते. कंपनी व्यवस्थापक दिनेश मित्तल यांच्याशी संवाद साधला असता आम्ही वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीसाठी कंत्राट दिले होते त्यामुळे यात आमचा काही दोष असण्याचे कारण नाही, कंपनीतील कामगारांना आम्ही सुरक्षा यंत्रणा देतो मात्र ते वापर करीत नाहीत यात आमचा काय दोष असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली आहे. वाडा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली असून फॅक्टरी इन्स्पेक्टर याबाबत तपासणी करून जो अहवाल सादर करतील त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कारखाने की मृत्यूचे सापळे?

वाडा तालुक्यात मोठे औद्योगिक क्षेत्र असून अनेक कारखाने अस्तित्वात आहेत. कारखान्यांवर कुणाचेही बंधन नसल्याने अनेक विनाशकारी कारखाने एकीकडे प्रदूषण ओकत असताना दुसरीकडे कारखान्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कामगारांच्या सुरक्षेचे धिंडवडे उडाले असून कामगार सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान अबिटघर येथील प्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT