ठळक मुद्दे
ऐन गणेशोत्सवात रमाबाई अपार्टमेंट रहिवाशांवर दुखा:चा डोंगर कोसळला
या दुर्घटनेत वाढदिवस असलेल्या एक वर्षीय मुलीचा मृत्यू
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत
नालासोपारा (विरार) : गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच, विरार पूर्व भागात मंगळवारी (दि.26) रात्री पावणेबाराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवाशी अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ रहिवाशांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत वाढदिवस असलेल्या एक वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवात रहिवाशांवर दुखा:चा डोंगर कोसळल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विरारच्या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे या दुर्घटनेत अनेक परिवार उद्धस्त झाले आहेत. एनडीआरएफ वसई-विरार मनपाचे अग्निशमन दलाचे जवान शोध कार्य करत आहेत.
आपल्या लाडक्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करणाऱ्या विरारमधील जोविल कुटुंबावर काळाचा आघात झाला आहे. इमारत दुर्घटनेत एक वर्षाच्या चिमुकल्या उत्कर्षासह तिची आई आरोही (२४) यांचा मृत्यू झाला आहे. आई आणि मुलीचा वाढदिवशीच झालेला करूण अंत सर्वांनाच चटका लावून गेला आहे. वाढदिवसासठी घरात पाहुणे, मित्र परिवार जमला होता. सगळं आनंदात सुरू होतं. उत्कर्षाच्या वाढदिवसानिमित्त घरीच छोटेखानी सोहळा आयोजित केला होता. यासाठी सजावटही करण्यात आली होती. नवीन कपडे घातलेल्या उत्कर्षासोबत आलेल्या पाहुण्यांनी फोटोही काढले. मात्र त्यानंतर झालेल्या या घटनेमुळे वाढदिवसाचे हेच फोटो अंतिम ठरले आहे. वाढदिवसाचीच रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. रात्री इमारतीचा भाग कोसळला आणि जोविल कुटुंबीय इमारतीच्या ढिगाखाली गाडले गेले.
रमाबाई अपार्टमेंटच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची मागणी भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्घटनेचा आढावा घेऊन मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांना पाठवून आपाग्रस्तांना सहाय्य केले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन यांनी विरार (पूर्व) येथील दुर्घटनाग्रस्त रमाबाई बिल्डिंग घटनास्थळी भेट दिली. तसेच दुर्घटनेत जखमी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. शासनाच्या वतीने तात्काळ वैद्यकीय व आर्थिक मदतीची हमी दिली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना व घडलेल्या घटनेचा सविस्तर आढावा घेतला.
आरोही ओंकार जोवील (२४)
उत्कर्षा जोवील (१)
लक्ष्मण किसकु सिंग (२६)
दिनेश प्रकाश सकपाळ (४३)
सुप्रिया निवळकर (३८)
अर्णव निवळकर (११)
पार्वती सकपाळ (६०)
दिपेश सोनी (४१)
सचिन नेवाळकर (४०)
हरिश सिंग बिष्ट (३४)
सोनाली रुपेश तेजाम (४१)
दिपक सिंग बोहरा (२५)
कशिश पवन सहेनी (३५)
शुभांगी पवन सहेनी (४०)
गोविंद सिंग रावत (२८),
ओमकार जोईल,
रोहिणी चव्हाण
प्रभाकर शिंदे (५७) महानगरपालिकेचे तुळींज हॉस्पिटल
प्रमिला प्रभाकर शिंदे (५०) प्रकृती हॉस्पिटल, बोळींज विरार (प.)
प्रेरणा शिंदे (२०) महानगरपालिकेचे तुळींज हॉस्पिटल
प्रदीप कदम (४०) उपचारानंतर सोडण्यात आले
जयश्री कदम (३३) उपचारानंतर सोडण्यात आले
मिताली परमार (२८) संजीवनी हॉस्पिटल, विरार (प.)
संजॉय सिंग (२४) प्रकृती हॉस्पिटल, बोळींज विरार (प.)
मंथन शिंदे (१९) प्रकृती हॉस्पिटल, बोळींज विरार (प.)
विशाखा जोवील (२४) प्रकृती हॉस्पिटल, बोळींज विरार (प.)