शहापुरात पकडलेला बिबट्या तो नरभक्षक बिबट्या नव्हेच? pudhari photo
ठाणे

Shahapur Leopard News : शहापुरात पकडलेला बिबट्या तो नरभक्षक बिबट्या नव्हेच?

21 दिवसांच्या शोधमोहीमेनंतर मादी बिबट्या जेरबंद मात्र ग्रामस्थांमध्ये संभ्रम कायम

पुढारी वृत्तसेवा

डोळखांब : शहापूर तालुक्यातील लाद्याचिवाडी - कळभोंडे परिसरातील जंगलात तब्बल 21 दिवसांच्या शोधमोहीमेनंतर वनविभागाने जेरबंद केलेला बिबट्या हा नरभक्षक नसल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पकडण्यात आलेला बिबट्या मादी जातीचा आणि कमी वजनाचा असल्याने मुलावर हल्ला करणारा खरा नरभक्षक अद्याप जंगलातच असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

लाद्याचिवाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगिवले याच्यावर काही दिवसांपूर्वी नरभक्षक बिबट्याने हल्ला करून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तत्काळ हालचाली करत जंगल परिसरात पिंजरे, चित्रिकरण यंत्रणा तसेच ड्रोन कॅमेरे तैनात केले होते. मात्र संबंधित बिबट्या अत्यंत चलाख असल्याने तो कोणत्याही पिंजऱ्यात अडकत नव्हता.

ग्रामस्थांच्या मते, मुलावर हल्ला करणारा बिबट्या हा नर जातीचा, उंच व सुमारे 90 ते 95 किलो वजनाचा होता. याउलट वनविभागाने पकडलेला बिबट्या हा केवळ 30 ते 35 किलो वजनाचा मादी बिबट्या असल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या काही फुटेजमध्येही ही मादी बिबट्या दिसून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

नरभक्षकाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला तब्बल 21 दिवस कडक पहारा ठेवावा लागला. या मोहिमेसाठी शासनाचा मोठ्या प्रमाणावर खर्चही झाला आहे. मात्र अखेर योगायोगाने मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांसह वनविभागालाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

तरीही पकडण्यात आलेलाच बिबट्या हा कृष्णा आगिवलेवर हल्ला करणारा नरभक्षक आहे की नाही, याबाबत ग्रामस्थांच्या मनातील संभ्रम अद्याप कायम असून वनविभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  • हा बिबट्या जुन्नर, घाटघर किंवा डोंगररांगांमधून विस्थापित होऊन या जंगल परिसरात वास्तव्यास आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुलावर हल्ला करणारा खरा नरभक्षक बिबट्या घटनेनंतर भीतीपोटी घाटघरच्या दिशेने परंपरागत मार्गाने स्थलांतरित झाला असावा, त्यामुळे तो वनविभागाच्या नजरेत आला नसल्याचेही बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT