

शिराळा शहर: बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर हणमंत पाटील या सहा वर्षाच्या बालकास हल्ला करून ठार करणाऱ्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यात अखेर वनविभाग, पुणे डॉग स्कॉड पथक, रेस्क्यू पथक, तसेच सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाला यश आले. बुधवार, दि 4 रोजी पहाटे तीन ते चार यादरम्यान बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या घटनेमुळे बिऊर, तडवळे, उपवळे, कदमवाडी या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
याबाबत अधिक माहिती अशी, राजवीर हणमंत पाटील हा बहीण कार्तिकीबरोबर घराशेजारी असणाऱ्या रस्त्यावर खेळत होता. शुक्रवार, दि. 30 रोजी अमृतनगर परिसरात त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने राजवीरला गळ्याला पकडून शेतात धूम ठोकली. बहीण कार्तिकी ओरडल्याने घरातील व आसपासचे लोक धावत आले. याची चाहूल लागताच बिबट्या राजवीरला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पळून गेला होता. त्याला तत्काळ शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले होते.
त्यानंतर संतप्त जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडले. उपजिल्हा रुग्णालयात हजारो ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हजर केल्याशिवाय आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ पारधी यांना निलंबित केल्याशिवाय शवविच्छेदन करणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, सम्राट नाईक, विराज नाईक, रेणुका देशमुख, साईतेजस्वी देशमुख, सत्यजित नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे ,सुखदेव पाटील, राजेंद्र पाटील, बंटी नांगरे यांनी मध्यस्थी करून जमावाला शांत केले. काही वेळाने वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी नवनाथ कांबळे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील, पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले उपजिल्हा रुग्णालयात पोचले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ पारधी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गांभीर्याने दखल घेऊन कारवाईचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर नवे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याची रणनीती आखली. पुणे, कोल्हापूर येथील रेस्क्यू पथकाला पाचारण केले. तसेच पुण्याच्या डॉग स्कॉड पथकाने ही मोलाची भूमिका पार पाडली. मंगळवार, दि. 3 रोजी डॉग स्कॉड आले. पथकातील श्वानांनी बिबट्याचा माग दाखविला. डॉग स्कॉडच्या सूचनेनुसार पिंजरे लावण्यात आले आणि बुधवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला.
मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, वनरक्षक रजनीकांत दरेकर, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, पंकज कदम, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, नामदेव सिद, सचिन पाटील, प्रथमेश पोळ, गौरव गायकवाड, कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार, अल्माटीन बांदी, पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे निनाद ताम्हणकर, सागर शिंदे अभिलाष बनसोडे, डॉग स्कॉड प्रमुख शोमीत भिडे, शुभम सिंग यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका पार पाडली.
बोकडाऐवजी पिंजऱ्यात कोंबड्या
बिबट्याने ज्या जागी राजवीरला हल्ला करून टाकले त्याच जागी लावलेल्या पिंजऱ्यात कोंबड्यांच्या आमिषाने तो पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान जेरबंद झाला.