Vegetable Price Pudhari File Photo
ठाणे

Vegetable Price Hike: पावसाचा फटका; भाज्यांचे भाव कडाडले

कोथिंबीर, टोमॅटो, भेंडीसह पालेभाज्या महागल्या

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यासह नाशिक आणि अन्य भाजीपाला उत्पादक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर झाला आहे. बाजार समित्यांमध्ये पालेभाज्या आणि शेंगभाज्यांची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याने भाज्यांचे दर कडाडले असून, सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

सध्या कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. पूर्वी २० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची जुडी आता ५० रुपयांपर्यंत पोहोचली असून, मध्यम आकाराची जुडी तब्बल १०० रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक कोथिंबीर खरेदी करण्याचे टाळत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. भेंडीचे दरही ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.

मेथीची जुडी २० रुपयांवरून ४० ते ५० रुपयांवर गेली असून, पावसामुळे भाजी ओलसर होत असल्याने ग्राहकांकडून तिच्याकडेही पाठ फिरवली जात आहे. कांद्याच्या पातीच्या किमतीतही वाढ झाली असून, मोठी जुडी १०० रुपये तर लहान जुडी ४० रुपयांना विकली जात आहे.

शेपू आणि पालक प्रत्येकी ३० रुपयांना उपलब्ध आहेत. टोमॅटोचे दरही तेजीत असून सध्या ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. फरसबी आणि गवार यांचे दरही ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते, नाशिक, पुणे आणि इतर प्रमुख शेती पट्ट्यांतून बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक पावसामुळे मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे, पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर बाजारात मागणी वाढली असून पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास भाज्यांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT