Vasai Virar Stray Dog Attack
चेतन इंगळे
विरार : वसई-विरार शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या बनला आहे. महापालिकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ या दोन महिन्यांत तब्बल १० हजार १२० नागरिक श्वानदंशाचे बळी ठरले. म्हणजेच दररोज सरासरी १६६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच श्वानदंशाच्या घटनांनी एवढी मोठी संख्या गाठल्याने महापालिकेच्या श्वान नियंत्रण उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील सहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होते. २०२० मध्ये ११ हजार ६३०, २०२१ मध्ये ११ हजार ५०८, २०२२ मध्ये १७ हजार ६७४, २०२३ मध्ये ३० हजार २४३, २०२४ मध्ये ३६ हजार ६७७, तर २०२५ मध्ये तब्बल ४६ हजार ३५४ श्वानदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या. २०२० ते २०२५ या कालावधीत घटनांमध्ये तब्बल ३४ हजार ७२४ने वाढ झाली आहे. २०२५ मध्ये दररोज सरासरी १२७ श्वानदंशाच्या घटना घडल्या; मात्र २०२६च्या पहिल्या दोन महिन्यांत ही संख्या १६६पर्यंत पोहोचली आहे.
शहरातील रस्ते, बाजारपेठा, सोसायट्या, शाळांच्या परिसरासह कचरा संकलनाच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे थवे वाढले आहेत. पादचारी, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्यांचा विशेष धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांच्या पाठलागामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.
श्वानदंशामुळे रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका असल्याने नागरिकांनी चावा किंवा ओरखडा झाल्यास तातडीने जखम स्वच्छ करून वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. नालासोपारा येथे नऊ वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बीजीकरण आणि रेबीजविरोधी लसीकरणाच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. त्यासोबतच उघड्यावर पडणारा अन्नकचरा रोखणेही महत्त्वाचे आहे. प्रभागनिहाय श्वानदंशाच्या घटना, कुत्र्यांची संख्या, निर्बीजीकरण व लसीकरणाची माहिती संकलित करून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
२०२६च्या पहिल्याच दोन महिन्यांत १० हजारांहून अधिक नागरिक श्वानदंशाचे बळी ठरल्याने महापालिकेने आता ठोस आणि बहुआयामी कृती आराखडा राबविण्याची मागणी जोर धरत आहे.