खानिवडे (ठाणे) : वसईतील चिंचोटी धबधब्यात वाहून गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर बाहेर काढण्यात आले. मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रुप चिंचोटी धबधबा येथे आला होता. यातील सहा जण पाण्यात बुडाले होते. त्यापैकी चार जणांची सुखरूप सुटका झाली होती तर दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते.
मुंबईतील गोरेगाव येथील सहा जण सोमवारी चिंचोटी धबधब्यावर सहली निमित्त आले होते. हे सर्वजण महाविद्यालय विद्यार्थी होते. दुपारी ते धबधब्याच्या पुढे असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले. मात्र त्यापैकी एकालाही पोहता येत नव्हते. याचवेळीअचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यातील चौघे जण कसेबसे डोहाच्या बाहेर आले. मात्र प्रल्हाद सहजराव (वय २२) आणि सुशील डबाळे (वय २४) असे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
या दोघांचे मृतदेह पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर बाहेर काढण्यात आले असून वसई अग्निशमन दलाचे पथक त्यांचा शोध घेत होते. चिंचोली धबधब्यावर अतिउत्साही तरुण पर्यटकांमुळे दुर्घटनांचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाने या भागात पावसाळी पर्यटनावर बंदी घातली असली सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवत काही पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचतात. दोन वर्षांपूर्वीही अचानक वाढलेल्या प्रवाहात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली होती.