Sea garbage Uttan pudhari photo
ठाणे

Sea garbage Uttan : अतिवृष्टीत कचरा, मृत जनावरे उत्तन समुद्रकिनारी आले वाहून

किनाऱ्यावर दुर्गंधी पसरल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी आठवडाभर अतिवृष्टी झाली. यावेळी समुद्राला देखील उधाण आले होते. यावेळी समुद्रातील कचरा व अतिवृष्टीमुळे वाहून आलेली मृत जनावरे उत्तन समुद्र किनाऱ्यावर वाहून येऊ लागले आहेत. यामुळे किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली असून तेथील मच्छिमारांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

समुद्रात साऱ्या जगाचा कचरा नाले, नद्या व खाड्यांद्वारे वाहून येत असतो. हा वाहून आलेला कचरा समुद्रातील खवळलेल्या लाटा पुन्हा किनाऱ्यावर वाहून आणतात. समुद्राला उधाण आले कि, त्यातील कचरा किनाऱ्यावर जमा होतो, हे आता नैसर्गिक चक्रच बनल्याचे संकेत मिळू लागले आहेत. किनाऱ्यावरील कचऱ्याचा डोलारा कमी करण्यासाठी अथवा शून्य कचरा निर्माण करण्यासाठी लोकांना नद्या, नाले, खाड्या, समुद्रात कचरा न टाकण्याचे आवाहन सतत केले जाते. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचे किनाऱ्यावर जमा होणाऱ्या कचऱ्यावरून दिसून येते.

यंदा आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीच्या कालावधीत समुद्राला देखील उधाण आले होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर समुद्रातील उसळणाऱ्या लाटांद्वारे उत्तन किनाऱ्यावर कचऱ्याचे लोट वाहुन येऊ लागले आहेत. यामुळे किनाऱ्यावर कचऱ्याचा सडा पडल्याचे चित्र दिसू लागले असतानाच यंदाच्या अतिवृष्टीमुळे दगावलेली जनावरे देखील उत्तन किनाऱ्यावर वाहून येऊ लागल्याचे दिसून आले आहे.

असा प्रकार पहिल्यांदा दिसून येऊ लागल्याने किनाऱ्या-वरील मच्छिमारांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा व मृत जनावरांमुळे तेथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे किनारा विद्रुप होऊन परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.

किनारा स्वच्छ करण्याची मागणी

किनाऱ्यावर जमा झालेला कचरा वेळेत उचलण्यास पालिका देखील विलंब लावत असल्याने किनाऱ्यावरील कचऱ्याचा सडा सतत वाढू लागला आहे. यामुळे समुद्र किनाऱ्याला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप आल्याचा भास होत असून किनाऱ्यावर वाहून आलेले मृत जनावरांची विल्हेवाट कोण लावणार, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांपुढे उभा ठाकला आहे.

यावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. किनाऱ्यावर जमा होणार कचरा पालिकेने तात्काळ उचलून किनारा स्वच्छ करावा तसेच वाहून आलेल्या जनावरांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी मच्छिमा-रांकडून होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT