पापलेटच्या पिल्लांची होतेय दिवसेंदिवस बेसुमार मासेमारी file photo
ठाणे

pomfret fish overfishing issue : पापलेटच्या पिल्लांची होतेय दिवसेंदिवस बेसुमार मासेमारी

उच्च दर्जा लाभणारा ‘सुपर सरंगा’ मासा बाजारातून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पालघर किनारपट्टीसह वसई, अर्नाळा, डहाणू, सातपाटी या प्रमुख बंदरांवरून निघणार्‍या मोठ्या ट्रॉलर्सनी पापलेट माशाच्या लहान पिल्लांची सर्रास मासेमारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे वजनानुसार उच्च दर्जा लाभणारा ‘सुपर सरंगा’ मासा बाजारातून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

पापलेट हा मासा वजनानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला जातो. त्यात 500 ग्रॅमहून अधिक वजनाच्या माशाला ‘सुपर सरंगा’ असे नाव देण्यात येते. याखालोखाल 350-500 ग्रॅमचा पहिला नंबर, 200-350 ग्रॅमचा दुसरा आणि 100-200 ग्रॅमचा तिसरा किंवा चौथा नंबर असा दर्जा दिला जातो. मात्र, अलीकडच्या काळात 100 ग्रॅमच्या आत असलेल्या पिल्लांचीच मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याने मोठ्या आकाराचा पापलेट सापडण्याचे प्रमाण झपाट्याने घटले आहे.

सध्या बाजारात ही लहान पिल्लंच पापलेट म्हणून विकली जात आहेत. त्यामुळे ना त्यांचा चवीलाही तोच गोडवा आहे, ना व्यापार्‍यांना योग्य भाव मिळतो. ग्राहकही फसवले जात असून मोठ्या पापलेटची कमतरता अधिक तीव्र होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

बंदीच्या कालावधीत लहान मासे पकडणार्‍यांवर पहिल्यांदा एक लाख, दुसर्‍यांदा दोन लाख व तिसर्‍यांदा पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. आतापर्यंत दोन बोटींवर कारवाई झाली आहे. 15 सप्टेंबरपासून बंदरांमध्ये बॅनर लावून जनजागृती सुरू करण्यात येणार आहे.

बाजारभावावर परिणाम काय?

सध्या मोठ्या पापलेटचा पुरवठा खंडित झाल्याने बाजारात लहान पिल्लांना देखील जास्त दराने विकले जात आहे. मात्र त्या तुलनेत त्यांची चव, पोषणमूल्ये आणि प्रत खूपच कमी असते. मोठा पापलेट 2,000 पर्यंत दराने विकला जात असतानाच, लहान पिल्लांसाठीही 800 ते 1,200 इतके दर घेतले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT