नेवाळी : वालधुनी नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. मात्र आता उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेला केडीएमसी हद्दीतील वसार गावाच्या परिसरात जीन्स कारखाने सुरु झाले आहेत. या जीन्स कारखान्यांमधून निघणारा रासायनिक सांडपाणी थेट सिमेंट पत्र्यांच्या आडून नाल्यांमधून वालधुनी नदीत जात आहे. परंतु नदी प्रदूषणाचा हा प्रकार प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या निदर्शनास न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वालधुनी नदीच्या प्रदूषण वाढत असल्याने उल्हासनगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयासह हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये वालधुनी नदी कश्या पद्धतीने दूषित झाल्याचा लेखाजोखा न्यायालयासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि स्थानिक पोलिसांना कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
उल्हासनगर शहरामधून बंद झालेले कारखाने परिसरातील ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी स्थलांतरित झाले होते. मात्र नागरिकांच्या तक्रारी नंतर ग्रामपंचायतींनी हे कारखाने बंद देखील केले आहेत. मात्र आता उल्हासनगर महापालिका आणि केडीएमसीच्या सीमेवर पुन्हा जीन्स कारखाने सुरु झाले आहेत. वसार गावाच्या हद्दीत सुरु झालेल्या या कारखान्यांमधून रासायनिक सांडपाणी थेट नाल्यांमधून वालधुनी नदीत प्रवेश करत आहे.
जीन्स कारखाने सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास येऊ नयेत यासाठी त्यांना सिमेंटच्या पत्र्यांची झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र सुरु असलेल्या कारखान्यां मधील रासायनिक उघड्यावर सोडण्यात येत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. त्यामुळे केडीएमसी हद्दीत सुरु झालेल्या या जीन्स कारखान्यांवर कारवाईसाठी कोण पुढाकार? असा प्रश्न आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष
वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी सामाजिक संघटनांकडून सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. कोट्यवधींचा निधी देखील नदी स्वच्छतेसाठी वापरण्यात येत आहे. मात्र ज्या नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने आता पुन्हा सुरु झाल्याने नदीचे रूपांतर प्रदूषित नदीत होणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ कधी याकडे गांभीर्याने लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.