उल्हासनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व शांत वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. याच अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र दहशतवादी व विघातक कृत्य प्रतिबंधक कायदा एमपीडीए अंतर्गत एक वर्षाकरिता स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे.
स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कॅम्प 4 मधील शिवशक्ती कॉलनी येथे राहणारा तुषार उर्फ गोटया संतोष गोडांबे आणि भीम कॉलनी येथे राहणारा अमोल पांडुरंग सावंत यांचा समावेश आहे. या दोन्ही गुन्हेगारांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून जबर मारहाण, धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत माजवणे, नागरिकांना धमकावणे अश्या प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या प्रस्तावास मंजुरी देत दोन्ही अट्टल गुन्हेगारांना एका वर्षांकरिता नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आगामी निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी अशाच प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी स्पष्ट केले आहे.