

Ulhasnagar Crime Branch Action
उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाड येथील अमरडाय कंपनी परिसरात छापा टाकून चोरीच्या मोटरसायकलवरून सोन साखळी खेचणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून तीन लाख रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अशोक पवार व पोलीस शिपाई नितीन बैसाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने अमरडाय कंपनी परिसरात सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी, पोलिस अंमलदार सुरेश जाधव, सतीश सपकाळे, प्रकाश पाटील व चालक अविनाश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकशीत शेरअली फकीर वर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे समोर आले. तसेच साथीदार मुसा आणू इराणी याच्यासह उल्हासनगर परिसरात दोन सोनसाखळी चोरी केल्याची कबुलीही त्याने दिली. याबाबतचे गुन्हे हिललाईन पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंद आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल, 10 ग्रॅम सोन्याचे तुटलेले मंगळसूत्र आणि 15 ग्रॅम सोन्याची बोरमाळ असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपीला पुढील तपासासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.