उल्हासनगर : शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3587 परवडणाऱ्या घरांच्या बांधकामासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने तब्बल 723 कोटी 11 लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा गृहनिर्माण प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. असे असताना भाजपने ही आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.
निविदेनुसार उल्हासनगर कॅम्प 4 मधील संतोष नगर परिसरात 1789 घरे तर उल्हासनगर कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात 1789 घरे अशी एकूण 3587 घरे उभारण्यात येणार आहेत. या घरांसोबत पक्के रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण जाळे, वीजपुरवठा तसेच समाजोपयोगी नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत जमिनीचे सर्वेक्षण, मातीची चाचणी, आराखडा व नकाशे तयार करणे, इमारत बांधकाम, तसेच अंतर्गत व बाह्य पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी निविदेद्वारे नियुक्त कंत्राटदाराकडे सोपवली जाणार आहे.
शहरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासास मंजुरी अशा अनेक विकासकामांना गती देणाऱ्या खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकारातून हा गृहनिर्माण प्रकल्प साकारत असून लवकरच उभारणीचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामुळे शहरातील वाढती गृहनिर्माण गरज पूर्ण होऊन कमी उत्पन्न गटातील नागरिकांना सुरक्षित, परवडणारी व सुविधांनी युक्त घरे उपलब्ध होणार आहेत.