उल्हासनगर : बदलापूर येथील स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उल्हासनगरमधील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी तरुणी सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ चित्रित करून ते पुढे पाठवत असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणाऱ्या सोनल गरेवाल तरुणीला बदलापूर पोलिसांनी अटक केली होती. तपासादरम्यान समोर आले की, ही तरुणी सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे सोनोग्राफी करताना मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून ते इतरांकडे पाठवत होती. दरम्यान, उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी नियमित पाहणी दौऱ्यादरम्यान भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली. त्यावेळी संबंधित तरुणी सोनोग्राफी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय पात्रता तिच्याकडे नसतानाही ती सोनोग्राफी करत असल्याचेही उघड झाले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत डॉ. धर्मा यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित सोनोग्राफी सेंटर सील केले असून त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनाही या प्रकाराची माहिती होती का, आणि असल्यास त्यांनी याबाबत तक्रार का केली नाही, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.