

उल्हासनगर : शहरात महाशिवरात्री दरम्यान भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे वारंवार वाद निर्माण होत होते. वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी या गंभीर मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. पण यावर्षी गणेशोत्सव काळात हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांचे दुर्दैवी निधन झाले
या याचिकेची दखल घेत मागील पाच वर्षांपासून उल्हासनगर शहरात ‘भोंगेमुक्त महाशिवरात्र’ हा उपक्रम महापालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने सातत्याने राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महाशिवरात्रीच्या कालावधीत भोंगे वाजवणाऱ्या तरुणांकडून तसेच भोंगे विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून पोलीस विभागाकडून भोंगे जप्त करण्यात येतात. त्यामुळे धार्मिक सण साजरे करताना होणारे ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आले असून, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत पोलिस प्रशासनाचे कौतुकही केले आहे. दरम्यान, यावर्षी गणेशोत्सव काळात हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे यंदा हा उपक्रम सुरू राहणार की नाही, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. मात्र, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरात विशेष मोहीम राबवत शेकडो भोंगे जप्त केले.
या कारवाईमुळे यंदाही उल्हासनगरमध्ये शांततेत व भक्तिभावाने भोंगेमुक्त महाशिवरात्र साजरी करण्यात आली. ध्वनी प्रदूषणाविरोधात सातत्याने लढा देणाऱ्या सरिता खानचंदानी यांच्या कार्याची आठवण म्हणून पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असल्याची भावना शहरात व्यक्त होत असून, ‘भोंगेमुक्त महाशिवरात्र’ उपक्रम पुढील काळातही कायम ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.