उल्हासनगर : जुन्या वादाचा निकाल लावण्यासाठी गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मयत तरुणाचे नाव साजिद सादिक शेख (राहणार वरप गाव, जिल्हा परिषद शाळेजवळ) असे आहे. शुक्रवारी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांच्यात वाद झाला होता.
हा वाद मिटवण्यासाठी रात्री दीड वाजता कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिराजवळ, ममता हॉस्पिटलजवळ, प्रवीण उज्जैनवाल याने साजिदला बोलावले. वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याने प्रवीण उज्जैनवाल याने जवळील चाकूने साजिदवर सपासप वार केले. तर रोहित पासी याने लाकडी दांडक्याने साजिदच्या डोक्यावर मारहाण केली. साजिदसोबत असलेल्या सारंग साठे यालाही लाकडी बांबूने मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गंभीर जखमी झालेल्या साजिद शेखला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, अंकुश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, पोलिस उपनिरीक्षक रणजीत वाळके, आशिष पवार, पोपट नवले, दिपक यादव, निलेश माने, शालक भोई, गणेश जाधव, सुजित भोजने, भीमराव शेळके, मोहन श्रीवास, अविनाश जाधव, भगवान पाटील, राजू तडवी, संदीप शेकडे, भगवान पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या मदतीने प्रवीण उज्जैनवाल आणि रोहित पासी यांना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.