

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प-३ मधील महापालिकेने 'अतिधोकादायक' म्हणून घोषित केलेली पाच मजली इमारत रात्रीच्या सुमारास कोसळली. ही इमारत आधीच रहिवाशांकडून रिकामी करून सील करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, इमारतीचा ढिगारा शेजारील बैठ्या घरांवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कॅम्प-३ मधील सी ब्लॉक परिसरात असलेली 'शिव जगदंबा अपार्टमेंट' ही पाच मजली इमारत असून, त्यात २९ सदनिका आणि दोन दुकाने होती. महापालिकेने ही इमारत अतिधोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर ती रहिवाशांकडून रिकामी करून सील केली होती. मात्र, काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा टेरेसपासून तळमजल्यापर्यंतचा मागील भाग पूर्णपणे कोसळला.
या दुर्घटनेत इमारतीचा मलबा शेजारील बैठ्या घरांवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या घरांमध्ये राहणारे नागरिक वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. "महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करूनही ती वेळेत जमीनदोस्त केली नाही. प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर आज आमची घरे वाचली असती," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. या घटनेमुळे शहरातील इतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.