उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज दुपारी उल्हासनगर मधील शहीद अरुण कुमार वैद्य हॉल येथे महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या 78 इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या 20 असून तीन सदस्यीय प्रभाग 2 व चार सदस्यीय 18 प्रभाग आहेत. 78 जागापैकी 13 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती, 21 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 42 जागा सर्वसाधारण असून त्यापैकी 20 जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी 7 जागा अनुसूचित जाती (महिला), 1 जागा अनुसूचित जमाती (महिला), 11 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि 20 सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
या आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर आरक्षण सोडतीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. नागरिकांना 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत प्रारूपावर हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवडणूक विभागाचे उपायुक्त विशाखा मोटघरे यांनी केले.