Ulhasnagar Municipal Election
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट चित्र समोर आले असून बोडारे, भुल्लर, लुंड आणि पाटील यांच्या घरातून प्रत्येकी तीन उमेदवारांना तिकिटे देण्यात आल्याचे समजते. तर अनेक घरांमध्ये दोन उमेदवारी देण्यात आल्या आहेत. या व्यापक पक्षपाती तिकिट वाटपामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.
गेल्या आठवड्यात उद्धव सेनेतून भाजपात प्रवेश केलेले जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी स्वतः, पत्नी आणि वाहिनीसह तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे सेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, पत्नी चरणजित कौर आणि मुलगा विकी भुल्लर यांना पॅनल 5 आणि 3, तर भाजपाचे अमर लुंड, शेरी लुंड व कांचन लुंड यांनीही अशाच पद्धतीने पॅनल 16 आणि 17 मधून उमेदवारी दाखल केली आहे. कॅम्प 5 मध्ये विजय पाटील यांच्या कुटुंबात शिवसेनेने पॅनल 19 आणि 20 मधून तीन तिकीटे दिली असल्याचे समजते.
याशिवाय चौधरी, बागुल, चक्रवर्ती, कलानी यांसह विविध घरांतील दोन-दोन उमेदवारी अर्ज समोर आले असून यावरून शहरात घराणेशाहीचे प्राबल्य कायम असल्याचे दिसते. याउलट, वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
उल्हासनगरात शिवसेना शिंदे गट, ओमी टीम व साई पक्षामध्ये ३५-३२-११ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. ओमी टीमचे उमेदवार शिंदेसेनेच्या चिन्हावर, तर साई पक्ष स्वतःच्या टीव्ही चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. मात्र या जागा वाटपातही तिकीट वाटपावरून नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे. शिंदे सेनेने शहरप्रमुख आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या रमेश चव्हाण यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात तिकीट नाकारून शेजारील प्रभागातून उमेदवारी दिली. त्यांच्या मजबूत प्रभागातून सुशील पवार यांच्या आईला तिकीट देण्यात आले आहे.
सलग तीनवेळा नगरसेवक राहिलेल्या ज्योती माने यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माजी नगरसेविका जयश्री सुर्वे आणि युवाधिकारी बाळा श्रीखंडे यांनाही तिकीट नाकारल्याने त्यांनी पर्यायी मार्ग अवलंबला असून, श्रीखंडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
तिकीटांवर अन्याय झाल्याची भावना असल्याने काही उमेदवारांनी उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकाच घरातील उमेदवारींच्या वाढत्या संख्येमुळे निवडणूक चुरशीची आणि राजकीय पातळीवर वैमनस्याची होण्याची शक्यता वाढली आहे.