उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरु केली आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा, पर्यावरण आणि मंडळांना आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
उत्सवापूर्वी शहरातील मुख्य रस्ते, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे तात्काळ भरून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, कृत्रिम विसर्जन तलावांची दुरुस्ती करून त्यांना सुसज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या तलावांमध्ये विसर्जित होणाऱ्या मूर्ती तात्काळ कल्याण खाडीत विसर्जित केल्या जातील आणि मूर्ती उघड्यावर राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. तलावांच्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था केली जाईल आणि आवश्यकतेनुसार विद्युत रोषणाई व प्रकाश व्यवस्थाही केली जाणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. विसर्जन घाटांवर मनपा कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मंडप, चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय केली जाईल. कृत्रिम विसर्जन तलावांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, तर रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक आणि अग्निशमन विभागाचे पथकही तैनात केले जाईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने स्पर्धा जाहीर केली आहे. सर्वोत्कृष्ट देखावा तयार करणाऱ्या मंडळांना अनुक्रमे ३ लाख, दीड लाख आणि ५० हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जातील. तसेच, गणेश मंडळांना ओला-सुका कचरा वेगळा करून निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे, कमीत कमी बॅनर्स वापरण्याचे, डॉल्बी (डीजे) आणि फटाकेमुक्त उत्सव साजरा करण्याचे, तसेच रक्तदान शिबिर व स्वच्छता शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळांना तात्पुरत्या मंडपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, नागरिक सुविधा केंद्रांवरही ही मदत मिळेल. सार्वजनिक गणेश मंडळांनी दुपारी ४ वाजेपासून मिरवणूक काढून रात्री १२ वाजेपर्यंत विसर्जन पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आढळल्यास आणि नियमांचे उल्लंघन करून रस्त्यांवर मंडप उभारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या बैठकीतील सूचनांनुसार, उल्हासनगर महानगरपालिका गणेशोत्सवासाठी पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.