उल्हासनगर : उल्हासनगर येथील महात्मा फुले नगरमध्ये एका घरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिललाईन पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत हुक्का पार्लर चालवणारे दोघे भाऊ आणि हुक्का ओढणाऱ्या सहा ग्राहकांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून महात्मा फुले नगरमधील खडी मशीनजवळ पवन माने आणि त्याचा भाऊ विशाल शांताराम माने हे आपल्या घरात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवत होते. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10:55 च्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात घरात सहा तरुण हुक्का ओढताना आढळले.
पवन आणि विशाल हे प्रत्येक हुक्का पॉटसाठी ग्राहकांकडून ₹250 घेत होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत हुक्का पार्लर चालवणारे पवन माने आणि विशाल माने यांच्यासह मयुर अनिल खत्री (23), नितीन दयाल शमदशनी( 27), कुणाल विष्णुमल दौडेजा (25) ओम सुरेश लुंड, ( 22) बंटी मुरलीधर अगिचा, (27)तुषार मनोहरलाल खटवानी,( 23) या ग्राहकांना पोलिसांनी या सर्वांवर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, 2003 च्या कलम 4 ए आणि 21 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवाल्यांचे धाबे दणाणले आहे.