

डोंबिवली : नाशिकमध्ये राहणाऱ्या डॉक्टर महिलेकडून वैद्यकीय व्यवसायासाठी कर्ज देण्याचे अमिष दाखवून डोंबिवलीतील एका खासगी सावकाराने कर्ज प्रक्रिया करण्याच्या नावाखाली १२ लाख रूपये उकळले. मात्र कर्जासाठी लागणारी कोणतीही प्रक्रिया पार न पाडता डॉक्टर महिलेला ५ लाख ८० हजार रूपये परत केले. मात्र उर्वरित ६ लाख २० हजार रूपये परत न करता सावकाराने आर्थिक फसवणूक केल्याचे या महिला डॉक्टरने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे. फसगत झालेल्या या महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा सारा प्रकार घडला आहे.
यातील तक्रारदार महिला डॉक्टर असून त्या नाशिक जिल्ह्यातील तिडके वसाहत परिसरात राहतात. तर आरोपी सावकार हा पश्चिम डोंबिवलीतील गणेशनगर परिसरात राहणारा आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीत गणेशनगरमध्ये राहणाऱ्या खासगी सावकाराने नाशिक येथील महिला डॉक्टरला त्यांच्या डोंबिवलीतील घरी व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याचे आश्वासन दिले.
पतपेढ्या, पतसंस्था, खासगी वा सरकारी बँकांकडे जाण्याऐवजी झटपट कर्ज मिळणार असल्याच्या आशेने तक्रारदार डॉक्टरने खासगी सावकाराकडून कर्ज घेण्याची तयारी दर्शवली. कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली मुद्रांक शुल्क, कर्ज प्रक्रिया शुल्क, व्याज, बयाणा रक्कम असे एकूण १२ लाख रूपये खासगी सावकाराने डॉक्टर महिलेकडून उकळले. कर्ज प्रक्रियेसाठी लागणारी रक्कम दिल्यानंतर महिला डॉक्टरने सावकाराकडे कर्ज देण्याची मागणी सुरू केली.
तथापी सावकार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. कर्ज देणार नसाल तर आपले कर्ज प्रक्रियेसाठी दिलेले १२ लाख रूपये परत द्या, असा तगादा महिला डॉक्टरने लावला. सततच्या तगाद्यानंतर सावकाराने डॉक्टर महिलेला ५ लाख ८० हजार रूपये परत करून उर्वरित रक्कम नंतर देतो, असे आश्वासन दिले. वर्ष उलटून देखील सावकाराने उर्वरित ६ लाख २० हजार रूपये परत केले नाहीत. आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर डॉक्टर महिलेने रविवारी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून फौजदार अनिल शिनकर आणि त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत.