उल्हासनगर : अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका युवकाला नालंबी खदान रोड परिसरातून ताब्यात घेतले आहे. दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत.
उल्हासनगर गुन्हे शाखेचे रामदास उगले व प्रसाद तोंडलीकर यांना माहिती मिळाली की एक इसम अवैध शस्त्र घेऊन नालंबी खदान परिसरात येणार आहे. या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय काजारी, पोलिस अंमलदार सतीश सपकाळे, अमर कदम, प्रसाद तोंडलीकर, नितीन बैसाने, रामदास उगले यांच्या पथकाने सापळा रचला.
सकाळी आठ वाजताच्या सुमारास संशयित ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून कंबरेत लपवलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. अटक आरोपीचे नाव हजरत अली झाकीर हुसेन उर्फ युसुफ असून तो उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.