

उल्हासनगर : जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर इमली पाडा येथे विरोधी टोळीकडून दोन राउंड गोळीबार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उल्हासनगर मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
उल्हासनगर कॅम्प तीन मधील इमली पाडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादुर करोतिया हा राहतो. काही महिन्यांपूर्वीच हा गुंड जेलमधून सुटून आला आहे. तो इमली पाडातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्रां बरोबर उभा असताना तिथे मोटार सायकल वरून पाच ते सहा जणांची टोळी आली. यातील मोहित हिंदुजा याचा सचिन करोतीया याच्या भावाशी जुना वाद असल्याने या रागातून सचिनवर दोन राऊंड फायर केले आणि निघून गेले. तसेच झालेल्या गडबडीत मोहित याच्या कडून दोन राऊंड खाली पडले.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, महेश काळे, पोलिस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, प्रमोद जाधव, चंदुलाल शिंदे, किशोर काळे, प्रशांत धुळे, कृपाल शेकडे, निलेश नागरे, सुशांत हांडदेशमुख यांच्या पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले.
मोहित हिंदुजा, धीरज पारवानी आणि कृष्णा राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केले आहे.