उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ४ मधील श्रीराम चौकाजवळील वसीटा कॉलनीमध्ये ७० वर्षीय काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसीटा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
माहितीनुसार, काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसीटा हे श्रीराम चौक येथील वसीटा कॉलनीमध्ये राहायला आहेत. ते मंगळवारी दुपारी ४ वाजता वसीटा कॉलनी गेटवर उभे होते. त्यावेळी नशेचे पदार्थ विकणाऱ्या अजय बागुल हा तिथे आला होता. वसीटा यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी अजय बागुल याने कमरेला असलेला कोयता काढून वसीटा यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वसीटा थोडक्यात बचावले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अजय बागुल विरोधात जीवे मारण्याचाप्रयत्न, शिवीगाळ व धमकावणे या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.