उल्हासनगर : रस्त्याच्या मध्ये गाडी उभी करून वाहतूक अडवणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या महासचिवाला जाब विचारणे तरुणाला भारी पडले आहे. त्याला युवा मोर्चाच्या महासचिवाने सहकाऱ्यांच्या मदतीने मारहाण केली आहे.
दोन दिवसांपूर्वी रोशन पुरस्वानी हा रस्त्याच्या मधोमध कार पार्क करून मित्रांसोबत बोलत होता. त्याच त्याच वेळेस मागून आलेल्या विशाल गुप्ताने त्याला कार हलवण्यास सांगितले. हा राग मनात धरून रोशन पुरस्वानी, विपिन तलरेजा, राज वाल्मिकी, दिवेश भगवाने यांनी विशालला शुक्रवारी रात्री सी ब्लॉक रस्त्यावर अडवले.
त्याला जाब विचारत त्याला हातानी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रोशन पुरस्वानी याने त्याच्या हातातील चावीने विशाल यांच्या उजव्या डोळ्याखाली मारून गंभीर दुखापत केली आहे. तसेच या मारामारीत विशाल यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईलचे नुकसान झाले आहे. गंभीर जखमी विशालला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी 24 तासानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.