

उल्हासनगर : गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाल्यावर एका गटातील नशेखोर तरुणांनी 12 चारचाकी वाहनांच्या काचांची तोडफोड केली. ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीता कॉलनीच्या रोडवर घडली आहे.
उल्हासनगर कॅम्प ४ मधील व्हिटिसी ग्राउंड शेजारील गीता कॉलनी मध्ये गणेशोत्सव मंडळाने सोमवारी सायंकाळी बेकायदेशीररित्या विसर्जन मिरवणूक काढली होती. ह्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला होता. हा वाद तात्पुरता सोडविण्यात आला होता. मात्र रात्री परिसरातील दुसऱ्या गटातील काही तरुणांनी नशा करून गीता कॉलनी येथील गल्लीत उभ्या केलेल्या 12 गाड्यांच्या काचा फोडल्या.
त्यानंतर ह्या तरुणांनी मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या मैद्याच्या ट्रकची तोडफोड करीत चालक सुरेश नायक याला मारहाण केली आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या वाहन चालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक(गुन्हे)चंद्रहार गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास यंत्रणेला गती दिली असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी आशेळे पाडा येथे तलवारीने गाड्यांची तोडफोड करून महिलेवर वार करणाऱ्या लाला या आरोपीला अटक करण्यात आल्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी परवाच आरोपीची वस्तीतून वरात काढून त्यांच्या दहशतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता 12 गाड्यांची तोडफोड करणाऱ्या नशेखोर तरुणांची दहशत संपवण्यासाठी विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची देखील धिंड काढावी अशी मागणी होत आहे.