BJP Pudhari
ठाणे

Political News: भाजपातील अंतर्गत वादातून परस्परविरोधी गुन्हे?

नगरसेवक विपुल मयेकर व प्रधान पाटील यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर: महापालिकेतील डी.आर. टेंडरच्या कामाच्या समर्थन पत्रावरून झालेल्या वादानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही प्रकरणांतील फिर्यादी भाजपशी संबंधित आहेत.

एका बाजूने भाजपचे नगरसेवक तथा दलित वस्ती समितीचे सभापती विपुल दत्ताराम मयेकर यांनी फिर्याद दिली असून, दुसऱ्या बाजूचा फिर्यादी मोहन करिरा चंद हा भाजपचे नगरसेवक प्रधान पाटील यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

नगरसेवक विपुल मयेकर यांच्या फिर्यादीनुसार प्रधान पाटील, त्यांचा मुलगा जतिन पाटील, कल्पेश भोईर, मोहन, कल्पेश व इतर १० ते १५ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादीसह इतरांना मयेकर यांच्या दालनात घुसून शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, फिर्यादीने आपल्याला वाचविण्यासाठी आलेल्या इतर व्यक्तींनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच काही जणांचे कपडे फाडणे, खिशातील रक्कम, चावी व इतर वस्तूंचे नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच सभापती कार्यालयातील साहित्याची ही तोडफोड केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

त्यांच्या भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांचा समर्थक मोहन चंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विपुल मयेकर, अभिषेक राठोड, देव मेहकर उर्फ देवेंद्र मिस्री, श्रीनिवास हुडडे, मुरली लांबा व इतर ४ ते ५ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींनी समर्थनपत्र न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उल्हासनगर महापालिकेच्या वस्ती व निर्माण समिती सभापती कार्यालयात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

भाजपशी संबंधित दोन गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे नगरसेवक विपुल मयेकर आणि भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्या समर्थकांमधील हा वाद असल्याने भाजपातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले असून, मध्यवर्ती पोलीस या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT