Ulhasnagar AMRUT 2.0 project pudhari photo
ठाणे

Ulhasnagar AMRUT 2.0 project : २११ कोटींच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी

अमृत २.० योजनेत समावेश; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत उल्हासनगर महापालिकेच्या 211 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेला मंजुरी मिळवून देण्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मोलाचे योगदान असल्याची माहिती कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.

या योजनेमुळे भविष्यात उल्हासनगरकरांना सुरळीत, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे उल्हासनगरची पाणी समस्या सुटणार असल्यामुळे महापौर अश्विनी निकम यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून अनेक नेत्यांनी उल्हासनगर महापालिकेला स्वतःच्या पाण्याचा स्त्रोत उभारण्यासाठी प्रयत्न केले. हा विषय खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर आल्यावर त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेसाठी पाणीपुरवठ्याचा स्वतःचा स्रोत विकसित करण्याच्या योजनेच्या कामासाठी मेसर्स जवादे अँड असोसिएट्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी प्रकल्पाचे प्राकलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सादर केले.

प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 33 टक्के म्हणजे 70 कोटी 35 लाख रुपये, राज्य शासनाकडून 36.67 टक्के म्हणजे 77 कोटी 40 लाख रुपये अनुदान मिळणार असून, उर्वरित 30 टक्के म्हणजे सुमारे 63 कोटी रुपये उल्हासनगर महापालिकेला उभारावे लागणार आहेत.

या योजनेअंतर्गत उल्हास नदीवरील मोहने येथे उदंचन विहीर उभारण्यात येणार असून तेथून पाणी उचलून म्हारळ गावामागील कानसई गाव येथे नेण्यात येणार आहे. या ठिकाणी 162 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रासाठी सौर ऊर्जा प्रणाली, वीज पुरवठा केंद्र, नदीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणि पुढे शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेपर्यंत जलवाहिन्या टाकण्याचाही या प्रकल्पात समावेश आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला महापौर अश्विनी निकम, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समिती सभापती कलवंत सिंग सोहता, सभागृह नेते अरुण अशान, आमदार कुमार आयलानी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी आमदार पप्पू कलानी, भाजप गटनेते राजेश वधारिया, कमलेश निकम, कुमारी ठाकूर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT