Farmer Financial Crisis
टिटवाळा: कल्याण तालुक्यात उल्हास नदीला आलेल्या अचानक पुरामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मांजर्ली गावातील शेतकरी बाबू गायकर यांच्या शेतातील सव्वाशे किलो भेंडी पुराच्या पाण्यात बाहुन गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीसाठी काढून ठेवलेली ही भेंडी संपूर्ण नष्ट झाल्यामुळे गायकर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
बाबू गायकर यांनी सांगितले की, खूप मेहनत करून भेंडी पिकवली होती. बाजारात नेण्यासाठी सकाळीच खुडून ठेवली होती. पण, दुपारी अचानक नदीला पूर आला आणि सगळं पीक पाण्यात वाहून गेलं. घरातून कसाबसा जीव वाचवून बाहेर पडलो. मेहनतीचे फळ डोळ्यांदेखत वाहून गेलं. पाण्यात पूर्ण बुडालेली भेंडी आता चिखलात गेल्याने ती विकण्यालायक राहिली नाही. याशिवाय त्यांच्या शेतातील अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच शेतात गुंतवणूक करून खतं आणि औषधं टाकली होती, ती सर्व मेहनत पाण्यात गेली आहे.
दरम्यान, फळेगावात विजेच्या धक्क्याने चार वासरांचा मृत्यू झाला असून गुरुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या गोठ्यालाही या घटनेचा मोठा फटका बसला आहे. या विजेच्या तडाख्यात काही गायी जखमी झाल्या आहेत. रायते, मोहिली, वरप, कांबा, आपटी आदी गावांमध्येही भाजीपाला, मका, पेंडा, लाकूडफाटा बाहून गेला असून अनेक जनावरांना इजा झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने पुढील हंगामही अडचणीत येण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांच्या मते, आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली अनेक बैठका आणि प्रशिक्षण घेतले गेले, पण प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी कोणी मदतीला आले नाही. नदीचा पूर सगळं घेऊन गेला आणि सरकारच्या आश्वासनांनी फक्त आशा निर्माण केली. आता कोणाकडे न्याय मागायचा? असा उद्विग्न सवाल बाबू गायकरसह अनेक बळीराजांनी केला आहे.