Kalyan Accident pudhari
ठाणे

Kalyan Accident: कचरा गाडीच्या चाकाखाली बालकाला चिरडले कल्याण पूर्वेतील वसारच्या गायकर नगरमधील दुर्घटना

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी: कल्याण श्री मलंगगड रोडवरील वसार गावातील गायकर नगर येथे शनिवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. केडीएमसीच्या कंत्राटी कचरा गाडीच्या धडकेत अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्या शिवम राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवम हा आपल्या घराबाहेर खेळत होता. त्याचवेळी केडीएमसीची कंत्राटी कचरा गाडी परिसरात आली होती. शिवमचे वडील चालकाला पुढे लहान मूल असल्याची सूचना देत होते. मात्र, तोपर्यंत गाडीचालकाने निष्काळजीपणे वाहन पुढे घेतल्याने चिमुकला गाडीखाली चिरडला गेला.

या भीषण अपघातात शिवमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर चालक त्याचे सहकारी आणि कुटुंबीयांनी तातडीने शिवमला कल्याण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माध्यमांशी बोलताना शिवमच्या आईला अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, “आम्ही कामावर जाण्याची तयारी करत होतो. मी आंघोळ करत होते आणि माझा मुलगा बाहेर खेळत होता. कचरा गाडी आली तेव्हा माझ्या पतीने चालकाला पुढे मुलगा असल्याचे सांगितले. पण चालकाने लक्ष न देता गाडी पुढे घेतली. माझ्या मुलाचे डोके पूर्ण फोडले गेले. तो माझा एकुलता एक मुलगा होता.”

या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी संबंधित चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT