डोंबिवली: कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कचरावेचक १५ वर्षीय मुलीवर भयंकर प्रसंग गुदरला आहे. या अल्पवयीन मुलीवर आजोबांचे वय असलेल्या दोघा सैतानांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.
या प्रकरणी अख्तर मणियार (वय ६०) व सलीम शेख (वय ६२) या दोघा नराधमांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. या दोन्ही नराधमांना फाशीच्या शिक्षेपर्यंत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केली.
कोळसेवाडीतील एका घरातून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीच्या रडण्यासह आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना जाग आली. रहिवाशांनी घरात जाऊन पाहिले असता घरभर रक्त पसरलेले आढळून आले. पित्त खवळणारा हा प्रकार पाहून रहिवाशांनी तात्काळ ही माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली.
पोलिसांचा तपास आणि कायद्याची भूमिका
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकजण एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो, तर दुसरा रिक्षा चालक आहे. घटनास्थळी असलेले घर भाड्याने देण्यात आले होते. पीडित मुलगी सध्या सुरक्षित असून तिला वैद्यकीय तपासणी व समुपदेशन सहाय्य देण्यात आले आहे.
पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवरील गुन्हे जलद गतीने चालविण्याची तरतूद आहे. पोलीस आता आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड आणि या प्रकरणात इतर अन्य कुणी सामील आहे का ? याचा तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर कल्याण पूर्व परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील रहिवाशांसह महिला संघटनांनी या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
नराधमांना फासावर लटकवा : गायकवाड
या घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना समाजात जागा नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा जलद तपास करून हा खटला जलदगती न्यायालयात सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.